नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांना चांगलेच खडसावले. विधानपरिषदेत अमोल मिटकरी यांनी भाजपा नेते सुब्रहण्यम स्वामी यांचं ट्विट वाचून दाखवले. यामध्ये नरेंद्र मोदींचा ‘रावण’ असा उल्लेख होता.
लक्षवेधीदरम्यान अमोल मिटकरी यांनी पंढरपूरच्या कॉरिडोअरचा मुद्दा उपस्थित करताना सुब्रहमण्यम स्वामी यांच्या ट्विटचा दाखला दिला. यामध्ये नरेंद्र मोदींचा रावण असा उल्लेख करण्यात आला होता. यावर सत्ताधारी आमदारांनी जोरदार गदारोळ करण्यास सुरुवात केली. यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर आक्षेप नोंदवला.
“अशा प्रकारचं विधान कोणीही करता कामा नये याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. आपली आणि त्यांची कुवत पाहिली पाहिजे. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरात त्यांनी गाजवलं आहे. याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे. जी-२० मध्ये संपूर्ण नेतृत्व करण्याची संधी आपल्या देशाला मिळाली आहे. माणूस बोलून जातो, पण आपल्या देशाचं नेतृत्व, गौरव जगभरात होत असताना तुम्हाला वाईट वाटत आहे का?”, असा प्रश्न त्यांनी केला.