Home » अहमदनगरचे नामांतर अत्यंत घाईने : जयंत पाटील

अहमदनगरचे नामांतर अत्यंत घाईने : जयंत पाटील

by Navswaraj
0 comment

नागपूर : भाजपाने अत्यंत घाईने अहमदनगरचे नामांतर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भगतसिंह कोश्यारी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर होते. राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महाराष्ट्र सदनातून पुतळे हटवण्यात आले. आपला बहुजन समाज सरकारचा निषेध करायला लागला, त्याचा धसका घेऊन घाईघाईत अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यात आले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हे नमूद करीत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन आयोग नेमला होता. मात्र विद्यमान राज्य सरकारने या प्रयत्नांना खीळ बसविली असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी अद्यापही ओबीसींसाठी प्रयत्न सोडलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूक होऊ नयेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. जातीनिहाय जनगणना करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. मात्र, भाजप जनगणना करायचे टाळत आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे समाजकारण हे बहुजन समाजाच्या हिताचे आहे. जीवाचे रान करून भाजप मोठा करणारे एकनाथ खडसे यांची पक्षात कोंडी करण्यात आली. शेवटी त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणे पसंत केले. स्वतःच्या पक्षातील ओबीसी नेत्यांवरही त्यांनी अन्याय केला आहे, असे पाटील म्हणाले

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!