अकोला : चंदन, शिसम, सागवान, ब्राम्ही आदी लाकडांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून काष्ठशिल्प चित्रे बनविण्याच्या अकोल्याच्या पंकज राजेंद्र डोंगरे या 28 वर्षाच्या तरुणाच्या कलेने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनाही भुरळ घातली. पंकजने साकारलेले काष्ठशिल्प खरेदी करत नितीन गडकरी यांनी त्याचे कौतुक केले.
अकोला जिल्ह्यातील दापुरा गावातील पंकज डोंगरे या तरुणाने ही कला जोपासली आहे. पंकजने काष्ठशिल्पातून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची किंमत दोन लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. पंकज याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही काही प्रतिमा साकारल्या होत्या. या प्रतिमा पाहिल्यानंतर गडकरी यांनी त्यातील एक प्रतिमा खरेदी करत पंकजाचे मनोबल वाढविले. खरे तर नितीन गडकरी यांना ही प्रतिमा भेट देण्यासाठी पंकज नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी गेला होता. परंतु गडकरी यांनी पंकजला रिकामे हाती न पाठवता ही कलाकृती खरेदी केली.