Home » कोरोनावरून भारत अलर्ट : पुन्हा मास्क बंधनकारक होण्याची शक्यता

कोरोनावरून भारत अलर्ट : पुन्हा मास्क बंधनकारक होण्याची शक्यता

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्यानंतर जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात आपल्यातील अनेकांना जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देश ठप्प झाला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही याकडे सरकारचे लक्ष असेल.

आरोग्य तज्ञांनी सांगितले की, चीनमध्ये 80 कोटी लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असून 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारतात संसर्गामुळे 12 मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मार्च 2020 नंतर रोजच्या मृत्यूच्या बाबतीत हे सर्वात कमी आहे. कोरोनाच्या रुग्णांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या आठवड्यात कोरोनाचे 1103 नवीन रुग्ण आढळले. चीनने झीरो काेविड धोरणात सवलत दिली होती. यानंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. स्थिती एवढी गंभीर झाली आहे की, रुग्णालयातील सर्व खाटा भरल्या आहेत. औषध नाही, जिथे कुठे असेल तिथे रांगा लावाव्या लागत आहेत. बीजिंमध्ये स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. येथील स्थिती एवढी वाईट की,अंत्यसंस्कारसाठी वेटिंग 2000 पर्यंत पोहोचले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!