अकोला : महाविकास आघाडी शासनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख असले तरी मराठी आणि मराठी माणसाच्या अवहेलनेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस नाराज होता. महाविकास आघाडी शासनाला मराठीचा पुळका आहे, हे दाखवण्यासाठी, राज्यातील दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठीत असावे असा निर्णय घेतला. याचा अर्थ फलक फक्त मराठी, देवनागरीतच असतील असा नसून, त्यासोबत अन्य भाषेचा वापर करता येईल, फक्त मराठी भाषा प्रारंभी असावी, तसेच दुसर्या भाषेची अक्षरे मराठीपेक्षा मोठ्या आकाराची नसावीत असे निर्णयात होते.
याला सुरूवात जितक्या जोमात झाली त्यापेक्षा जास्त वेगाने महानिर्णय थंड बस्त्यात पडला, अडगळीत फेकल्या गेलेली मराठी आणि मराठी माणसाला चुचकारण्याचा फंडा सपशेल फसला.
दारूविक्री, मासविक्री करणारी दुकाने, वाईनबार, हाॅटेल यांना गडकिल्ले, महापुरूष, देवी – देवता तसेच महनीय महीलांची नावे दिली जातात. अशी नावे देण्यात येऊ नयेत असे देखिल त्या शासन निर्णयात असते तर अधिक चांगले झाले असते. आता राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृवातील सरकार आहे, मराठी फलकांच्या निर्णयाची सुधारणेसह अंमलबजावणी व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.