Home » …म्हणून प्रदेशाध्यक्षांजवळ व्यक्त झाली अकोला भाजपमधील नाराजी

…म्हणून प्रदेशाध्यक्षांजवळ व्यक्त झाली अकोला भाजपमधील नाराजी

by नवस्वराज
0 comment

नागपूर : अकोल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी अलीकडेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मूर्तिजापूर दौऱ्यादरम्यान व्यक्त झाली. विद्यमान आमदारांबद्दल असलेल्या या नाराजीनाट्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. अशीच नाराजी अकोला भाजपमधुनही पुढे आली आहे. भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी एका आमदारासह काही नेत्यांबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. फरक ईतकाच की, या घटनेचा कोणताही व्हिडीओ व्हायरल झालेला नाही.

प्रसन्न जकाते

‘साहेब वेळीच नियंत्रण ठेवा नाही तर अकोला भाजपमधुनही शिंदे गटासारखा एखादा गट बाहेर पडेल..’, अशा शब्दात काहींनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना संभाव्य धोक्याचा ईशारा दिला. भाजपमधीलच एका जबाबदार वरिष्ठ नेत्याने याला दुजोरा दिला. अकोल्याच्या भाजपमध्ये असलेले वाद लपलेले नाहीत. त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

नाराजीची कारणे

अकोल्यातील भाजपमध्ये गटबाजी जोरावर आहे. त्यातून काही नेत्यांनी परस्पर विरोधी गटातील पदाधिकाऱ्यांना डावलण्यास सुरुवात केली आहे. त्याचा थेट परिणाम पक्षावर होत आहे. नवीन मतदार नोंदणीवरही त्याचा विपरित परिणाम झाला आहे. याची सातत्याने चर्चा होत होती. परंतु आता याचर्चेने तक्रारीचा सूर घेतला आहे.

भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचे दुसरे कारण म्हणजे, राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उत्सव निर्बंधमुक्त होतील असे सांगत होते, तर दुसरीकडे अकोल्यातील प्रशासन मंडळांवर जाचक अटी लादत आहे. मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या गर्जनेला काय अर्थ उरतो असा संतापही विविध उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकडुन व्यक्त होत आहे. मंडळ, पदाधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी सातत्याने ही बाब लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणुन दिली. परंतु अकोल्यातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. हा मुद्दा भाजपला अकोल्यात ‘कॅश’च करता आला नाही.

अकोल्यात पोलिस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांबद्दल सामान्यांसह लोकप्रतिनिधींचीही नाराजी आहे. अलीकडच्या काळात अकोल्यातील अनेक अधिकारी नेत्यांचे ऐकत नाही असेच चित्र आहे. लोकप्रतिनिधींचा पाहिजे तो आदरयुक्त वचक अकोल्यात दिसतच नाही. परंतु राजकीय गटबाजीपासून कुणालाही उसंत नाही, अशी टीका भाजपवालेच करीत आहे. नेत्यांची गटबाजी व अधिकाऱ्यांची मनमानी असेल तर सत्ता असूनही काय उपयोग असे अनेकांचे म्हणणे आहे.

विदर्भातील सर्वाधिक धुळीचे शहर, रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे असलेला जिल्हा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाही तहानलेले गाव, एकही चांगला उद्योग नसलेला जिल्हा, वारंवार जातीय तणाव निर्माण होणारे गाव, जग सायबर क्रांतीकडे जात असताना चांगल्या शैक्षणिक सुविधा नसलेले गाव अशी अनेक उपरोधिक टीकात्मक विशेषणे ‘अकोला’ या शब्दामागे किंवा पुढे जोडली जातात. दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांनी अकोल्याला आपल्या पदारात विकासात्मक बरेच काही पाडून घेता यावे, यासाठी संधी दिली, परंतु त्यानंतरही अकोल्याचा खरोखर कायापालट झाला काय, असा प्रश्न आजही अनेक जण उपस्थित करतात. अकोल्याचा सर्वांगीण विकास हा मुद्दा या गटातटाच्या राजकारणामुळे मागे पडल्याची बाबही बानवकुळे यांच्या लक्षात आणुन देण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समक्ष राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपमधील कलह पुढे येणे हे चांगले संकेत नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या कलहाचा फटका भाजपला तर बसेलच परंतु त्याचे दुरगामी दुष्परिणाम विकासाची आस धरून बसलेल्या अकोल्याच्या जनतेला अधिक तीव्रतेने भोगावे लागतील, असेही अनेकांचे म्हणणे आहे. अशात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चाकरून घेतलेल्या निर्णयांनंतर भविष्यात अकोला भाजपचे ‘कमळ’ फुलते की कोमेजते याकडे पक्षांतर्गत व पक्षबाह्य सर्वांचेच लक्ष आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!