अकोला : मान्सूनची चाहुल लागल्याने आता शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू झाली आहे. अशात शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना काळजी बाळगावी, असे अवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केले आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे, कीटकनाशके, खते नामंकित कंपनीची खरेदी करावी. बियाणे, खते यांच्या पिशव्या, पोते फाटलेली नाहीत, सील योग्य असून प्रामाणित केलेले आहेत, कीटकनाशकांचे डबे, कॅन सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. पक्के बील घ्यावे, वापरलेले थोडे बियाणे आणि खत सांभाळून ठेवावे. रिकामे पोते व पिशव्या पीक हाती येईपर्यंत फेकू नये, त्यावर तपशील छापलेला असतो. बियाणे, खतात दोष असल्यास किंवा काही तक्रार निर्माण झाल्यास ते अत्यंत आवश्यक असते.
कीटकनाशकांचा वापर कॅन व डब्यावरिल निर्देशानुसार करावा, जेणेकरून धोका निर्माण होणार नाही.
यंदा मान्सूनचे आगमन लांबले असल्यामुळे पेरणी करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत कृषी अधिकारी व शेती तज्ञांचा सल्ला घ्यावा. बियाणे, खते, कीटकनाशक या विषयी योग्य तक्रार असल्यास ग्राहक पंचायतशी संपर्क करावा, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोलातर्फे करण्यात आले असल्याचे विजय केंदरकर व मिलिंद गायकवाड प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले आहे.