Home » बच्चू कडूंना आलाय राजकारणाचा कंटाळा

बच्चू कडूंना आलाय राजकारणाचा कंटाळा

by Navswaraj
0 comment

अमरावती : माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार, अशी चर्चा कालपासून सुरू होती. त्यावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाचा आग्रह धरण्यात आला. शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केले. या देशात हे पहिले दिव्यांग मंत्रालय आहे. माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी घटना आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी हे खूप चांगले काम केले आहे.

मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, त्यामुळे मी त्यांची १७ जुलैला भेट घेणार आहे. १८ जुलैला मी आपला निर्णय जाहीर करणार आहे, असे आमदार बच्चू कडू यांनी आज सांगितले. बदलत्या राजकारणाचा आता कंटाळा आला आहे. या सर्व स्थितीकडे लोकांची पाहण्याची भूमिका योग्य नाही. काही लोक कॉमेंट करतात. ५० खोके म्हणून आमचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतात. माझी भूमिका मात्र ठाम आहे. दिव्यांग, शहीद परिवार, घरेलू कामगार, शेतमजूर, शेतकरी, घरांचे प्रश्न तसेच कार्यकर्त्यांसाठी मी काम करणार आहे. एकनाथ शिंदे जोपर्यंत सरकारमध्ये आहेत, तोपर्यंत या सरकारला माझा पाठिंबा राहील, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. माझी कुणावरही नाराजी नाही. पद हे माझ्यासाठी क्षुल्लक आहे. पदापेक्षा लोकांनी मला मोठे स्थान दिले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी भर घातली आहे.

एकनाथ शिंदे यांनी आमच्या दिव्यांग बांधवांचा विचार केला. त्यांना अडचण होऊ नये, त्यासाठी कुणीतरी माघार घेतली पाहिजे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. सध्या जे काही सुरू आहे ते नवीन नाही. यापूर्वीदेखील असे झाले आहे. परंतु त्याचा अतिरेक होऊ नये, असे बच्चू कडू म्हणाले. पद हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. आम्ही सामान्य माणसासाठी लढू व मरू, पण या सरकारमध्ये अशा पद्धतीने जायचे नाही, असे माझ्या डोक्यात आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार आहे. पद घेतल्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणे अधिक प्रभावी ठरू शकते, असेही आमदार कडू म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!