Home » गंध मनातील त्याहून हिरवा…

गंध मनातील त्याहून हिरवा…

by Navswaraj
0 comment

पद्मजा फेणाणी-जोगळेकर
ज्येष्ठ गायिका

आज पहाटे मला अचानक एक स्वप्न पडलं. स्वप्नातच मला माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर दि वसांची, सुंदर प्रवासाची आठवण होऊ लागली आणि मन प्रसन्न झालं. नुकताच लंडन मिफ्टाचा O2 अरेना येथील भव्य कार्यक्रम सादर करुन, आम्हां २५-३० कलाकार व इतर मंडळींचा (मृण्मयी देशपांडे, आनंद इंगळे, आपल्या सौभाग्यवतींसह महेश कोठारे) व परळची काही मंडळी, असा ग्रुप लंडन होऊन स्कॉटलंड टूरला रवाना झालो.

लंडन, अमेरिका,ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई, मलेशिया, सिंगापूर, जर्मनी इत्यादी आत्तापर्यंत केलेल्या परदेश वारींमध्ये सर्वांत सुंदर वाटलेला आणि मनाला हिरवागार ताजेपणा आणणारा हा स्कॉटलंड प्रदेश! सगळीकडे ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे…’ पण त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी तर सोडाच, पण रस्त्यांवर, हिरव्यागार गालीचांवर कुणी चिटपाखरू सुद्धा सहसा दिसत नसे. क्वचित ठिकाणी काही मेंढ्या फक्त दिसत. मेंढपाळही नसे…. तरीही स्वच्छता.

 

रस्त्याच्या कडेची मातीही शिस्तबद्ध! स्वतःला इकडे तिकडे न पसरवणारी….. डोळ्यांना…. मनाला….. आनंद आणि शांती देणारी ही टूर होती. लंडनच्या कार्यक्रमातील ‘वन्समोअर’चा प्रभाव अजूनही मनातून उतरला नव्हता. पुढचे १५ दिवस गाण्याचे कार्यक्रम नसल्याने, मनही कुठल्याही टेन्शनशिवाय रिते आणि उत्फुल्ल होते! बसच्या प्रवासात लांबच्या लांब हिरव्यागार शेकडो छटांची मैफल…. मध्येच रस्त्यांच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलांचे ताटवे…. हिरवे-जांभळे डोंगर, मधून मधून रांगड्या टेकड्या व खडक …. ‘कुठे कुठे कडे-कपारी अमृत प्याले’, अशी परिस्थिती…. अहाहा! अतिस्वच्छ हवा आणि तनामनाला झोंबणारा तरीही हवाहवासा वाटणारा गारवा..…काही किल्ले, खरेदीची ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे पाहिली. बसमध्ये सारे गाणी गात होते. भेंड्या खेळत होते. विनोद करत होते. आनंद इंगळेंचे विनोद ऐकून हसून हसून मुरकुंडी वळली होती.

 

स्कॉटलंड हा इंग्लंडमधला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि स्वाभिमानी देश. त्यांचा स्वतःचा ध्वज आहे. इथली माणसं शरीरयष्टीने भक्कम. इथली मंडळी कष्टाळू आणि बुद्धिमान. पण इंग्रजांसारखे आक्रमक आणि महत्वाकांक्षी नाहीत. या निसर्गाच्या सान्निध्यात या देशाने जगाला अनमोल अशी रत्ने दिली. ज्या ऑक्सफर्ड डिक्शनरीवरून आपण इंग्रजी समजतो, त्या शब्दकोशाची मूळ सुरुवात एका स्कॉटिश माणसाने केली. प्रकाश, विद्युत चुंबकत्वाच्या तरंगाचा (waves)आहे, हे सिद्ध करणारा मॅक्सवेल, दूरध्वनीचा उद्गाता बेल, चित्रवाणी (टीव्ही) प्रथम दाखवणारा बेअर्ड, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ, पेनिसिलीनचा शोध घेतलेला अलेक्झांडर फ्लेमिंग, क्लोरोफॉर्म वापरून बेशुद्धावस्थेतल्या शस्त्रक्रियेचा जनक सिम्पसन, वाफेवर यंत्र चालवणारा वॅड, डांबरी रस्त्याचे तंत्र काढणारा मॅकॅडम, हॅरी पॉटरची लेखिका जे.के. रोलिंग, मँचेस्टर युनायटेड या सुप्रसिद्ध यशस्वी फुटबॉल संघाचा प्रशिक्षक फर्ग्युसन आणि चिवट पण झुंझार टेनिसपटू, ज्याने इंग्रजांना अनेक दशकांनंतर टेनिसमध्ये प्रावीण्य मिळवून दिले, तो अॅन्डी मरे ही स्कॉटिशच! अशी एकाहून एक विविध विषयातली गुणी, दिग्गज, अजोड व्यक्तिमत्वं स्कॉटलंड ने दिली. प्रत्येकाला या निसर्गाने त्यांच्या कामात भरभरून ऊर्जा, प्रोत्साहन आणि साथ दिली असणार…

 

अशा या स्कॉटलंडवरून पुन्हा भारतात आल्यावर तो सुखद हिरवा रंग मन:पटलावरून महिनाभर हलत नव्हता. आजही मी पहाटे पहाटे स्वप्नात या हिरव्या रंगाच्या अनेक छटा पुन्हा पुन्हा पहात नादावले होते. मनस्वी आनंद घेत होते. बस मधून प्रवास करताना सुनीलच्या खांद्यावर मान रेलून तरल आणि मुक्त मनाने गात होते इंदिरा संतांच्या शब्दात ….

‘देता घेता त्यात मिसळला,
गंध मनातील त्याहून हिरवा….
गंध मनातील त्याहून हिरवा…’

(लेखिका प्रद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध गायिका आहेत.)

error: Content is protected !!