Home » अकोल्यात दोनशे वर्ष जुन्या वृक्षात विष टाकले; तरुणाईने मात्र आदर्श कार्य केले

अकोल्यात दोनशे वर्ष जुन्या वृक्षात विष टाकले; तरुणाईने मात्र आदर्श कार्य केले

by Navswaraj
0 comment

अकोला : देशात जंगल तोड सुरू आहे. विकासात्मक कामांसाठी झाडे तोडली जात आहेत. देशात प्रत्येक माणसामागे फक्त २८ वृक्ष आहेत. ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत खुपच कमी आहे. वृक्षांचे प्रमाण कमी झाल्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. तापमानत भयंकर वाढ झाली असून पर्जन्यमानाचा भरोसा राहिलेला नाही. परिणामी कोरडा व ओल्या दुष्काळासारखी संकटे येत आहेत. शासनाची वृक्षारोपण आणि संवर्धनाची आकडेवारी फसवी असते. परंतु काही वृक्षप्रेमी फक्त वृक्षारोपणच करीत नाहीत, तर ती जगवण्याची पराकाष्ठा करतात.

अकोल्यातील जुने शहरात प्रसिद्ध श्री काळा मारोती मंदिर आहे. मंदिरातील श्री हनुमान मूर्तीची स्थापन समर्थ श्री रामदास स्वामींनी केली आहे. मंदिराच्या प्रांगणाच्या कोपऱ्यात दोनशे वर्षवर वयाचा प्रचंड पिंपळ वृक्ष होता. काही वृक्षशत्रूंनी कुठलेतरी रासायनिक द्रव टाकल्यामुळे तो मार्च २०१८ मधे वाळून, कोलमडला. जुना वृक्ष नष्ट झाल्यामुळे परिसरातील रहिवासी दुःखी झाले. परंतु श्री काळा मारोती मित्र मंडळाच्या सदस्यांनी अत्यंत जिद्दीने जमिनीची स्वच्छता, मशागत करून १० जून २०१८ त्याच जागी पिंपळाचे रोप लावले, भोवती कुंपण केले. उन, पावसापासून रोपट्याचा बचाव करण्याची, खत, पाण्याची व वाढवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली.

झाडाच्या मुळाशी विषारी द्रव्य टाकल्यानंतर पिंपळ असा मृत्यूप्राय झाला.

झाडाने आता पाचव्या वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षी १० जूनला झाडाचा वाढदिवस पूजा, प्रार्थना करून थाटात साजरा केला जातो. त्यानिमित्त अन्नदान करण्यात येते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीप्रमाणे झाडाची, आप्तस्वकियासारखी जीवापाड जोपासना करणारे मंडळाचे सदस्य खरोखरच कौतुकास पात्र ठरत आहेत.

error: Content is protected !!