Home » शेगावातील पर्यटकांमध्ये उसळला ‘आनंद सागर’

शेगावातील पर्यटकांमध्ये उसळला ‘आनंद सागर’

by Navswaraj
0 comment

शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव येथील बंद असलेले आनंद सागर आध्यात्मिक केंद्र गुरुवार, ४ एप्रिल २०२३ पासून पुन्हा भाविकांच्या सेवेत रूजू झाले आहे. हे केंद्र गेल्या काही वर्षापासून बंद होते. आनंद सागर सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. संत श्री गजानन महाराज संस्थानने या मागणीची दखल घेत आनंद सागर प्रकल्प गुरुवारपासून पुन्हा कार्यान्वित केला.

संत श्री गजानन महाराज संस्थानने ठरवून दिलेल्या नियमानुसार गुरुवारी सकाळी दहा वाजता आनंद सागर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. कोणताही पुनर्लोकार्पण किंवा उद‌्घाटन सोहळा आयोजित न करता संस्थांनच्या नियमाप्रमाणे अत्यंत साधेपणाने आनंद सागरचे फाटक उघडण्यात आले. आनंद सागर सुरू होणार असल्याने गुरुवारी पहिल्याच दिवशी अनेकांनी शेगाव येथे हजेरी लावली होती. अवकाळी पावसामुळे तापमान सौम्य असल्याने शेगाव आणि आसपासच्या शहरांमधुन काही पर्यटक मुद्दाम पुन्हा सुरू झालेले आनंद सागर बघण्यासाठी येथे दाखल झाले होते. सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत हे अध्यात्मिक केंद्र सुरू असणार आहे, अशी माहिती संस्थानकडुन देण्यात आली. गुरुवारी पहिल्या दिवशी आनंद सागरला मोजक्या पर्यटकांनी भेट दिली. सध्या या केंद्रातील काही मोजकेच भाग सुरू करण्यात आले आहेत. पहिला दिवस असल्याने गर्दीचे प्रमाण कमी होते, असे सांगण्यात येत आहे.

३५० एकर जागेवर हा भव्यदिव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे. केंद्रात मत्स्यालय, तलाव, ध्यान केंद्र, फवारे, रेल्वेगाडी, झुलता पूल, ध्यान मंदिर असा परिसर आहे. २००१ मध्ये शासनाकडुन जागा मिळाल्यानंतर आनंद सागर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. आनंद सागर मुळे शेगांव जगाच्या नकाशावर आले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि पर्यटन वाढले होत. अनेक भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटनासाठी यायचे. त्यानंतर आनंद सागर प्रकल्प बंद करण्यात आला. डागडुजी आणि रंगकामही करण्यात आले. कोविड महासाथीमध्येही आनंद सागर अडीच वर्षे बंद होते. कोविडमुळे शासनाकडुन लावण्यात आलेले प्रतिबंध हटल्यानंतर आनंद सागर प्रकल्प सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीची दखल घेत आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये सेवेकरी आणि सुरक्षा रक्षक पुन्हा तैनात करण्यात आले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!