अमरावती : अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा एक पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात रिजवान उर्फ सोनू अहमद खान या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
अंजनगाव सुर्जी येथे चार डिसेंबर रोजी पोलिसांनी तीन पिस्तुलसह आठ जिवंत काडतुस लगतच्या लखाड गावातून जप्त केल्या होत्या. या प्रकरणात मोहम्मद नावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम या 30 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली होती. बुधवारी रात्री पोलिसांना शहरातील रिजवान या युवकाकडे पिस्टल आणि काडतुस असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शहरातील पानअटाई, खिडकीपुरा या परिसरात राहणाऱ्या रिजवानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. पोलिसांनी चार दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर भीती वाटल्यामुळे पिस्तूल फेकून दिल्याची माहिती रिजवानने दिली. रिजवान याने आपल्याकडे असणारी पिस्टल आणि सहा काडतुस अंजनगाव ते परतवाडा मार्गावर असणाऱ्या गळती गावाजवळील तोफनाल्यावरील पुलाच्या खाली लपवली असल्याची माहिती पोलिसांना दिली