Home » तरुणी म्हणाली, ‘लव्ह जिहाद’ वैगरे नाही, राणांनीच बदनामी केली

तरुणी म्हणाली, ‘लव्ह जिहाद’ वैगरे नाही, राणांनीच बदनामी केली

by नवस्वराज
0 comment

अमरावती : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अडचणीत येतात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणातील १९ वर्षीय तरुणीने हा प्रकार ‘लव्ह जिहाद’वैगरे काहीच नव्हता. आपण स्वत:हून व्यक्तीगत कारणांमुळे घरातून निघुन गेलो होतो. खासदार राणांनी उगाच आपली बदनामी केली असे स्पष्ट केले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणावरून जोरदार राडा केला होता. पोलिस उपायुक्तांसह अधिकाऱ्यांशीही त्यांनी वाद घातला. अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना लक्ष्य करण्याच्या नादात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कायदा व सुव्यवस्था बैठकीतही पोलिसांशी वाद घातला. अशात कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तरुणीनेच आता राणा यांनी बदनामी केल्याचे म्हटल्याने याप्रकरणातील हवाच निघुन गेली आहे.

संबंधित मुलीने पोलिसांकडे जबाब नोंदवताना ‘लव्ह जिहाद’वगैरे असा काही प्रकार नसल्याचे सांगत ‘माझ्या वैयक्तिक कारणांनी मी घर सोडून निघून गेले होते’, असे बयाण देत खासदार राणांना तोंडघशी पाडले आहे. एका विशिष्ट धर्मातील युवकाने मुलीचे अपहरण केल्याच्या आरोप असलेल्या या प्रकरणातील ही बेपत्ता मुलगी बुधवारी रात्री उशिरा सातारा येथे सापडली. अमरावती पोलिसांनी सातारा पोलिस आणि पुणे लोहमार्ग पोलिसांना सूचना दिल्यावर प्रवास करीत असलेल्या रेल्वेतून या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

अमरावतीमधील हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’ असल्याचे भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व खासदार नवनीत राणा सातत्याने ठासून सांगत होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या मुलीचा साताऱ्यातच प्राथमिक जबाब घेण्यात आला. ‘लीने माझ्यासोबत कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडला नाही. मी माझ्या काही वैयक्तिक कारणांनी गेली होती. मला कोणीही पळवून नेले नव्हते. माझी बदनामी थांबवा’, असे तिने पोलिसांना सांगितले. खासदार राणा यांनी खोटी माहिती दिली, असेही या मुलीने सांगितले.

मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत दिली होती. पोलिसांनीही तरुणीचा शोध घेण्यासाठी तातडीने सूत्रे फिरवली. पण तितक्यात खासदार राणा यांनी हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे सांगत पोलिस ठाण्यात राडा घालण्यास सुरुवात केली. शहरातील आंतरधर्मीय विवाह व लव्ह जिहाद प्रकरणातील मुलाशी थोडा कठोर व्यवहार करा, असे सांगण्यासाठी फोन केल्यानंतर पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांनी कॉल रेकॉर्ड केला असा राणा यांचा आरोप आहे. यादरम्यान पोलीस आणि खासदार राणा यांच्यात जोरदार शाब्दिक धुमश्चक्री उडाली.

पोलिसांनी चौकशी सुरू असल्याचे सांगत आम्हाला आणखी थोडा वेळ द्या, असे म्हटले. मात्र नवनीत राणा काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी या प्रकाराचा व्हिडीओ ट्विट करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले. प्रसार माध्यमांनी राणांनाच धारेवर धरल्यानंतर मात्र त्यांनी हा व्हिडीओ डिलिट करून टाकला. मात्र तोवर त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी रिट्विट केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. अशात राणा यांच्या दाव्यातील हवाच संबंधित मुलीने काढली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!