अकोला : समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या अन्याय व आर्थिक शोषणाविरुद्ध तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने मूर्तिजापूर येथील शेतकरी नाजुक घुमसे आणि त्यांची पत्नी माधुरी या दोघांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
घुमसे दाम्पत्य २३ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवित आहे. यातील लाभार्थ्यांचे अकोला समाज कल्याण विभागातील अधिकारी, त्यांचे दलाल व मंत्रालयातील अधिकारी आर्थिक शोषण करीत असल्याचा घुमसे यांचा आरोप आहे. या प्रकरणाबाबत संबंधित विभागाला तसेच शासनदरबारी पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही असे घुमसे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपला लढा असून न्याय मिळेपर्यंत उपोषण कायम राहिल, असे घुमसे दाम्पत्याने ‘नवस्वराज’ला सांगितले.