Home » अकोल्यातील डाबकी रोड उड्डाणपुलाचे लोकार्पण ऑगस्टमध्ये

अकोल्यातील डाबकी रोड उड्डाणपुलाचे लोकार्पण ऑगस्टमध्ये

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोला, तेल्हारा, शेगावमार्गे  बुलडाणा जिल्ह्याला जोडणारा डाबकी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावे १ ऑगस्ट २०२३ रोजी जनतेच्या सेवेत लोकार्पण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आली.

रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे काम येत्या १३ मे पासून सुरू होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. खासदार संजय धोत्रे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून डाबकी रोड उड्डाणपुल योजना मंजूर करून आणली होती. परंतु खर्च वाढल्यामुळे व निधी संपल्याने काम थांबले होते. रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात आपसी करार न झाल्यामुळे काम रखडले होते. यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी सतत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. गडकरी व फडणवीस यांनी १९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून रेल्वे खात्याकडे वर्ग केला. सद्य:स्थितीत उड्डाणपुलाचे काम ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. १३ व १५ मे रोजी मेगाब्लॉक घेऊन उर्वरित कामही पूर्ण करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट पूर्वी या रेल्वे पुलाचे काम रेल्वे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करून त्याचे लोकार्पण करेल असे बैठकीत सांगण्यात आले.

न्यू तापडिया नगर येथील उड्डाणपुलाचे काम १३ मे रोजी सुरू होणार आहे. येथे दोन अंडरपास प्रस्तावित आहेत. शहरातील नवीन वस्ती उमरी, जवाहर नगर, रामदास पेठ, सावंतवाडी या भागातील नागरिकांना न्यू तापडिया नगर, खरप तसेच आपातापा, म्हैसंगमार्गे दर्यापूर, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी सोय व्हावी यासाठी हे काम करण्यात येत आहे. न्यू तापडिया नगर रेल्वे गेटमुळे नागरिकांना वाहनांसह दीड ते दोन तास उभे राहावे लागत होते. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेता हे काम हाती घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलासाठीही निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु उड्डाणपुलाचे डिझाईन व रेल्वे विभागाच्या नियमांमुळे नवीन रेल्वे गेटवरील पुलाला जोडणाऱ्या मार्गाचा खर्च वाढला. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने हे काम थांबले होते. आता या कामाला पुन्हा वेग मिळणार आहे. ५० कोटी रुपये खर्च वाढल्यामुळे रेल्वे विभागाकडे २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बैठकीला रेल्वेचे अधीक्षक अभियंता भालेकर, अभियंता देशपांडे, उप अभियंता थावरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सरनाईक, उप अभियंता राठोड उपस्थित होते. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य वसंत बाछुका, शेतकरी नेते विवेक भरणे, गिरीश जोशी आदींनी यावेळी कामाची स्थिती जाणुन घेतली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!