Home » अकोल्यातील दंगलखोरांना परगावातूनही अटक

अकोल्यातील दंगलखोरांना परगावातूनही अटक

केवळ ‘प्यादे’ पकडले; ‘मास्टर माईंड’ अद्यापही गवसेना

by नवस्वराज
0 comment

अकोला : कथित सोशल मीडिया पोस्टवरून अकोल्यात उसळलेल्या दंगलीनंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. सध्या अकोल्यात तणावपूर्ण शांतता आहे. दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू आहे. दंगलप्रकरणी आतापर्यंत शंभरावर आरोपींना जुने शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिस्थिती पूर्ववत होत असली तरी पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ (धरपकड मोहिम) सुरूच आहे.

अकोल्यात दंगल घडविल्यानंतर जुने शहर, रामदासपेठ, अकोट फैल, दगडी पूल, काळा मारोती, डाबकी रोड, शिवसेना वसाहत, सिंधी कॅम्प, खदान या भागातील अनेक दंगलखोर अकोल्यातून फरार झाले होते. पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेजच्या आधारे आरोपींना पकडण्यास सुरुवात केली. आरोपींकडून ईतर दंगलखोरांची माहिती घेत अकोला पोलिसांनी शेगाव, पारस, बार्शीटाकळली, बाळापूर, पातूर येथेही लक्ष केंद्रीत केले आहे. शेगाव येथुन काही दंगलखोरांना जुने शहर पोलिसांनी अटक केली आहे.

दंगल घडवायची आणि काही दिवसांसाठी फरार व्हायचे असा पॅटर्नच समाजकंटकांनी अवलंबिला आहे. त्यामुळे अकोल्यातील परिस्थिती पूर्ववत झाली तरी अटकसत्र कायम ठेवायचे असे पोलिसांनी ठरविले आहे. पोलिस दंगलखोरांना पकडत असली तरी दगड फेकरणारे हे लोक केवळ ‘प्यादे’ आहेत. दंगल घडवून आणणारे ‘मास्टर माईंड वजीर’ अद्यापही पोलिसांच्या कचाट्यापासून दूरच आहे. त्यामुळे केवळ प्यादे न पकडता पोलिसांनी खरे ‘मास्टर माईंड’ शोधण्याची गरज आहे. जोपर्यंत या ‘मास्टर माईंड’ची पाळेमुळे पोलिस कापत नाही, तोपर्यंत अकोल्यातील जातीय सलोखा आणि शांतता कायम राहु शकत नाही.

दंगलीनंतर याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल अमरावती परीक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांमार्फत गृह विभागाला सादर होणार आहे. परंतु अकोल्यातील पोलिस विभागाला या दंगलीच्यानिमित्ताने अधिक सक्षम करणे आता काळाची गरज बनली आहे. अकोल्याचे पालकत्व असलेले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील अकोला दौऱ्यात समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांशी संवाद साधत अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था कोण बिघडवत आहे, याची नेमकी माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. एसआयडीने अकोल्यात दंगल घडेल असे पाच महिन्यांपूर्वीच सांगितलेले असताना या अहवालाकडे दुर्लक्ष झाले असल्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही त्यादृष्टीने समज देणे गरजेचे झाले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!