Home » मुंबईनंतर अकोल्यातही जमावबंदी आदेश; कलम 144 लागू

मुंबईनंतर अकोल्यातही जमावबंदी आदेश; कलम 144 लागू

by नवस्वराज
0 comment

अकोला : शिवसेनेतील बंडखोरीचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबईत कलम 144 लागू करण्यात आला आहे. आता अकोल्यातही जमावबंदी आदेश लावण्यात आले आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार आता पोस्टर जाळणे, मोर्चा, रॅली, आंदोलन, उपोषण आदीसाठी आधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मोठ्याने गाणी वाजविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीला असलेल्या बंडखोर शिवसेना आमदारांमधुन बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी आपली सुटका करून घेतली होती. अकोल्यात आल्यानंतर त्यांनी बळजबरीने इंजेक्शन देण्यात आल्याचा आरोप केला होता. तिकडे सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने देशमुख यांच्याविरोधात वॉर्डबॉयला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देशमुख यांना रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात नेल्याचे म्हटले होते.

आमदार देशमुख अकोल्यात परतल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला. मोठ्या राम मंदिरात महाआरतीही केली. सातत्याने निघणारे मोर्चे आणि आंदोलन यामुळे अकोला पोलिसांवरील ताण तर वाढला होताच शिवाय अकोला संवेदनशील असल्याने उपाय करणे गरजेचे होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर अकोल्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!