Home » अकोल्यात शहर बससेवा चार वर्षांपासून बंद

अकोल्यात शहर बससेवा चार वर्षांपासून बंद

by Navswaraj
0 comment

अकोला : पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. महानगरपालिकेची हद्दवाढ होऊन लगतच्या २४ गावांचा शहरात समावेश करण्यात आला. परिणामी, शहराच्या भौगोलिक क्षेत्रासोबतच व लोकसंख्येतही भर पडली. शहरातील नागरिकांना वाहतूक व्यवस्था म्हणून महापालिकेने २००४ मध्ये शहर बससेवा सुरू केली होती. एका स्थानिक संस्थेने कंत्राट घेऊन काही वर्षे ही सेवा सुरळीत चालू ठेवली. त्यानंतर मात्र संस्था अवसायनात निघाल्यामुळे बससेवा कोलमडली. अखेर २०१३ मध्ये शहर वाहतूक सेवा बंद झाली. त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये पुन्हा शहर बससेवा सुरू केली. श्रीकृपा ट्रॅव्हल्स नामक कंपनीने १५ ते २० गाड्यांच्या मदतीने शहर बससेवा सुरू केली, मात्र कंपनीच्या संचालकांनी बँकेच्या कर्जाचे कारण पुढे करत ही सेवा पुढे सुरू ठेवण्यात असमर्थतता दर्शविली. त्यामुळे जून २०१९ मध्ये शहर बससेवा बंद पडली. त्यानंतर २०२१ मध्ये शहर बससेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु त्याला यश न आल्यामुळे अकोलेकर अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून वंचितच आहेत.

शहरातील विविध मार्गांवर सिटी बससेवा सुरू होती, तेव्हा नागरिकांना शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी १० ते २० रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागत नव्हता. आता मात्र ही सेवा बंद झाल्यापासून ऑटोरिक्षाचालकांनी मनमानी करत दर वाढविले आहेत. रेल्वे स्थानकावरून बसस्थानक एक टप्पा व बसस्थानकावरून वेगवेगळे नगर हा दुसरा टप्पा, असे दोन टप्प्याचे एका प्रवाशाकडून ४० रुपये घेतले जातात. शहरात सात ते आठ किलोमीटरच्या प्रवासासाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!