Home » आमदार रवी राणा यांना सलग दुसऱ्यांदा शांत राहण्याचा सल्ला

आमदार रवी राणा यांना सलग दुसऱ्यांदा शांत राहण्याचा सल्ला

by नवस्वराज
0 comment

अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि बडनेऱ्याचे आमदार यांना शिंदे-फडणवीस सरकारने सलग दुसऱ्यांदा शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रहार पक्षाचे प्रमुख आणि आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्यातील वाद सध्या ईतका विकोपाला गेला आहे, की त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागत आहे.

यापूर्वी अमरावतीच्या कथित लव्ह जिहाद प्रकरणात खासदार नवनित राणा यांनी पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला होता. त्यावेळी देशभरातील प्रसार माध्यमांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातही खासदार राणा यांनी पोलिस आयुक्त आरती सिंह बैठकीला न आल्याने अन्य अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. कथित लव्ह जिहाद प्रकरण खासदार राणा यांच्यावरच उलटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना नागपुरात बोलावून घेतले व शांत राहण्याचा सल्ला दिला. आता आमदार बच्चू कडू यांच्याबाबतही राणा यांना शांत रहा असे सांगण्यात आले आहे.

सुरुवातीपापासूनच राणा आणि अमरावतीमधील अनेक राजकीय नेत्यांचे वाद राहिले आहेत. रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्याशी अमरावतीत विवाह केला त्यावेळी त्यांनी सामूहिक विवाह सोहळा घेतला होता. या आयोजनात विघ्न आणल्याचा आरोप करीत त्यावेळी राणा यांनी राजापेठेतील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. कालांतराने त्याच पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर नवनीत राणा खासदारकीची निवडणूक लढल्या. त्यावेळी सायंस्कोर मैदानावर आयोजित सभेत राणा पती-पत्नीने त्याच अजित पवार यांची तोंडभरून स्तुती केली होती.

अमरावतीचे शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ, विद्यमान आमदार सुलभा खोडके आणि अन्य नेत्यांशी राणा यांचा वाद जगजाहीर आहे. अमरावतीमधील काँग्रेस नेत्यांशीही राणा यांचे फारसे सख्य नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार राणा आणि खासदार राणा यांनी कमळाची कास धरली. खासदार नवनीत राणा यांना केंद्रात आणि आमदार रवी राणा यांना राज्यात मंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. अशात आता अमरावतीतून भाजपचा हक्काचे व्यक्ती डॉ. अनिल बोन्डे राज्यसभेत खासदार झाले आहे. त्यामुळे खासदार राणा यांच्या मंत्रिपदाच्या मार्गात एक प्रबळ स्पर्धा तयार झाली आहे.

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादालाही महाराष्ट्रातील मंत्रिपद कारणीभूत आहे. मंत्रिमंडळातील आपला पत्ता यांनीच कापला असे कडू आणि राणा दोघांनाही एकमेकांबद्दल वाटत आहे. अशात राणा यांच्याभोवती वाद वाढत गेला तर दिल्लीतील राजकारणात त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी कमी होत जाईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे राणा यांना शांत आणि संयम ठेवण्याचा सल्ला वारंवार दिला जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या वादात मध्यस्थी करेपर्यंत बच्चू कडू यांनी बॉम्ब फोडण्याचा आपला ईशारा कायम ठेवल्याने अमरावतीच्या गल्लीतून सुरू झालेला हा वाद मुंबईच्या मंत्रालयात व दिल्लीत काय रंग दाखवतो हे लवकरच स्पष्ट होईल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!