Home » महात्मा गांधींनंतर ८९ वर्षांनी राहुल अकोल्याच्या वाडेगावात

महात्मा गांधींनंतर ८९ वर्षांनी राहुल अकोल्याच्या वाडेगावात

by नवस्वराज
0 comment

अकोला : ‘बार्डोली ऑफ बेरार’ या नावाने अकोला जिल्ह्यातील वाडेगावला संबोधित करणाऱ्या महात्मा गांधी यांच्यानंतर ८९ वर्षांनी गांधी परिवारातील सदस्य खासदार राहुल गांधी गुरुवार, १७ नोव्हेंबर २०२२ रोजी वाडेगावात दाखल झालेत. राहुल यांची यात्रा वाशीम जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात दाखल झाली.

निगुर्णा नदीच्या पात्रात महात्मा गांधी यांनी जाहीर सभा घेतली होती. त्याच ठिकाणी राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या माध्यमातून वाडेगावात दाखल झालेत. १८ नोव्हेंबर १९३३ नंतर गांधी परिवारातील सदस्य राहुल वाढेगावात पोहोचल्याने या भागातील नागरिकांच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे. वाडेगावातून स्वातंत्र संग्रामात ३६५ स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. १९३२ मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहातही वाडेगाव, पारस, आलेगाव या भागातून अनेक जण सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्यातून पाच हजारावर काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले आहेत. अकोल्यातील इंटकचे पदाधिकारी प्रदीप वखारीया यांनी यात्रेदरम्यान महात्मा गांधी यांची वेशभूषा केली आहे. १८ नोव्हेंबर रोजी वखारीया शेगाव टी-पॉइंटवर खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराशी संवाद साधला. महिला किसान मंचच्या सीमा कुळकर्णी यावेळी त्यांच्यासोबत होत्या. केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेच्या पदरात काहीच टाकले नाही, असे राहुल यावेळी म्हणाले. मोदी आणि शहा यांनी जातीय राजकारण सुरू केले आहे. त्यांना देशाचे तुकडे करायचे आहे. भारत जातीय विद्वेशात वाटायचा आहे. त्यामुळेच आपण भारत जोडो यात्रा सुरू केल्याचे राहुल यावेळी म्हणाले. मोदी यांनी श्रीमंतांना कर्जमाफी दिली, परंतु कोरोना महासाथीमुळे पिचलेल्या लोकांच्या मदतीला ते धावले नाही अशी टीकाही त्यांनी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!