Home » ‘पावनखिंड’ चित्रपटातील कलावंतांनी घेतले गुरुमंदिरात दर्शन

‘पावनखिंड’ चित्रपटातील कलावंतांनी घेतले गुरुमंदिरात दर्शन

by Navswaraj
0 comment

नागपूर : तुफान गाजलेल्‍या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटातील कलावंतांनी गुरुमंदिराला सदिच्छा भेट देऊन सद्गुरुदास महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, निखिल लांजेकर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व बाजीप्रभूची भूमिका साकारणारे अजय पुरकर व त्यांचे सहकारी यांनी सद्गुरूदास महाराज (शिवकथाकार विजयराव देशमुख) यांना शिवाजी महाराजांच्या मंदिराची प्रतिकृती भेट स्‍वरूपात दिली.

कलावंतांनी सुमारे तीन तास शिवचरित्रावर सखोल चर्चा करून शिवचरित्रातील अनेक बारकावे सद्गुरुदास महाराजांकडून समजून घेतले. आजच्या तरुण पिढीने व्यापक व असूयारहित दृष्टिकोनातून शिवचरित्र समजून घेवून एक राष्ट्रपुरुष म्हणून शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून जगापुढे ठेवावे, अशी इच्छा सद्गुरुदास महाराज यांनी व्यक्त केली

दिग्‍दर्शक‍ दिगपाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेचे अनुभव सांगितले व शिवाष्टक म्हणजेच शिवचरित्रावरील आठ चित्रपट निर्माण करण्याचा संकल्प विदीत केला. त्यापैकी ‘पावनखिंड’ हा चौथा चित्रपट आहे. सद्गुरुदास महाराजांनी ‘पावनखिंड’ एक उत्कृष्ट चित्रपट असल्याचे सांगितले व उपस्थित कलाकारांचे कौतुक केले. याप्रसंगी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्‍यक्ष अजय देशमुख, विश्वस्त मनिष उद्धव, प्रसन्न बारलिंगे, मिलिंद खासनीस, राहुल खासनीस, रसिका देशमुख, सीमा पुंडलिक, अल्‍का पिल्लेवार, ओजस देशमुख, वीरेन अगस्ती, अमर देशपांडे, नीलेश देशपांडे यांची उपस्थिती होती. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने सर्व कलावंतांचा मानाचे शेले व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!