Home » तिसरा अंक व्हावा दमदार!

तिसरा अंक व्हावा दमदार!

by Navswaraj
0 comment

– विक्रम गोखले,
ज्येष्ठ अभिनेते

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देश आत्मनिर्भर बनत नव्हे जवळपास बनला आहे. बदल्या राष्ट्रासोबत नाट्य चळवळीने बदलणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज भासणार आहे.

रंगमंचाला अत्यंत जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले. रंगमंचाची सेवा करण्याची संधी मला या जन्मात मिळाली त्यामुळे धन्य झाल्याची भवना माझ्यात आहे. देशाच्या जडणघडणीत जसे तीन टप्पे होते तसेच ते नाट्य क्षेत्रातही राहिले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ आणि प्रगत भारत असे हे तीन टप्पे आहेत. खरे तर भारतीय रंगमंच अनादी काळापासून आहे. भारतीय रंगमंच पाच हजार वर्षांपासूनचा असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. छत्तीसगडच्या पहाडांमध्ये आजही महाकवी कालीदासनिर्मित नाट्यशाळांचे पुरावे सापडतात.

नाट्य क्षेत्राबाबत बोलायचे झाल्यास स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात रंगमंचावर देशभक्ती, देशाभिमान दिसायचा. रंगमंचावर देशभक्तीचे नारे ऐकू यायचे. देशाला स्वातंत्र्यप्राप्त झाल्यानंतर नाट्यक्षेत्र बदलत गेले. देशासोबत व्यावसायिक रंगभूमीही उदयास आली. प्रबोधनासोबतच उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनही नाट्य क्षेत्राकडे पाहिले जाऊ लागले. रंगमंचाने भारतीय चित्रपटसृष्टीलाही अनेक प्रतिभावंत कलाकार प्रदान केले. उत्पल दत्त, नसिरुद्दीन शहा, असरानी, गिरीश कार्नाड, रमेश भाटकर, दीप्ती नवल, ओम पुरी, शबाना आजमी, पंकज कपूर, सौरभ शुक्ला, डॉ. श्रीराम लागू, अनुपम खेर, बोम्मन ईराणी, रत्ना पाठक, आलोक नाथ, इर्फान खान, कुलभूषण खरबंदा, आशिष विद्यार्थी, परेश रावल, राहुल बोस, रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, सुप्रिया पाठक अशी कितीतरी नावे घेता येतील, जी भारतीय रंगमंचाने बॉलीवूड किंवा हॉलीवूडला दिली आहेत.

ही अनेक आघाडीची नावे घेत असताना रंगमंचाने वेगवेगळ्या क्षेत्रांना बरेच काही दिल्याचे आपण ठामपणे म्हणू शकतो, पण त्या त्या क्षेत्रांनी रंगमंचाला काय दिले याचा विचार जर केला तर नाट्य क्षेत्राची थोडी निराशा होईल असेच चित्र आहे. ६७ वर्षांपासून मी रंगभूमीचा सेवक आहे, पण अमूक एक गोष्ट नाट्यक्षेत्राला मिळाली आणि त्यातून भारतीय नाट्यक्षेत्राचा चेहरामोहराच पूर्ण पालटला अशी कोणतीही घटना मला तरी स्मरणात नाही. भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारतीय रंगभूमी, नाट्यक्षेत्र पूर्णत: राजकारणाशी संबंधित असू नये असे वाटते. अर्थात रंगभूमीला राजाश्रय नक्कीच मिळावा. काळानुरूप नाट्य क्षेत्राने अत्याधुनिक होणेही गरजेचे आहे. यासाठी आजच्या तरुणाईला रंगभूमीकडे वळविणे तितकेच गरजेचे आहे.

भारतीय शिक्षण पद्धतीत सक्षम कलावंत तयार होईल, यासाठी फारसा वाव नाही. चांगल्या कलावंतांची फौज घडविणाऱ्या संस्थानिर्मितींनाही प्रोत्साहन मिळाले पाहिजे. कलावंत तयार झालाच तर त्याला हमखास उदरनिर्वाहाचे साधन मिळेलच याची शाश्वती नाही. ही हमी जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत नवी पिढी रंगमंचाची सेवा करण्यासाठी सरसावणार नाही. छोटे चित्रपट, लघुचित्रपट, साहित्य लेखन, नाट्यलेखनालाही वाव मिळणे गरजेचे आहे. रंगभूमीने धर्मभेद, जातीभेद, प्रादेशिक भेद मिळविण्यासाठी पुन्हा नव्याने चळवळ उभारणेही काळाची गरज झाली आहे, कारण या कुप्रथांनी पुन्हा डोके वर काढले आहे. महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा ज्वलंत होतोय. महिलांचा आदर करण्यासाठी प्रत्येक जण प्रवृत्त व्हावा, अशा पद्धतीचे विषयही हाताळल्या जाणे गरजेच बनले आहे. राष्ट्र सर्वोच्च स्थानी आहे, ही भावना जनाजनाच्या मनामनात रूजविण्याची गरज आता पुन्हा भासत आहे. आधुनिक भारतासोबत रंगभूमीला, नाट्यक्षेत्रालाही आधुनिक करायचे असेल तर सरकार आणि कलावंत यांनीही संयुक्तरित्या तितक्याच आक्रमकपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. भारतीय नाट्यक्षेत्राचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर हे दोन अंक सर्वांनीच पाहिले; पण मध्यंतराच्या घंटेनंतरचा आधुनिक भारतीय नाट्यक्षेत्राचा तिसरा अंक प्रचंड दमदार ठरावा हिच अपेक्षा.

error: Content is protected !!