अकोला : पोलिसांनी इंटरनेट कॅफेवर घातलेल्या छाप्यात 12 मुलींना ताब्यात घेण्यात आले. या सर्व मुलींविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अकोला महिला आघाडीने पत्रकार परिषदेत अकोल्यातील इंटरनेट कॅफेमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकोला पोलिसांच्या दामिनी पथकाने सिव्हिल लाईन्स परिसरातील इंटरनेट कॅफेंवर छापा घातला. दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक उज्वला देवकर यांच्या नेतृत्वात इंटरनेट कॅफेवर हे छापे घालण्यात आले.
यापूर्वीही अकोला शहरांमध्ये इंटरनेट केफेंवर गैरप्रकार झाल्याची मोठी घटना उघडकीस आली होती. तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक नितीन लोहार यांनी त्यावेळी शहरातील इंटरनेट कॅफेंवर घातलेल्या छाप्यांमध्ये अशाच पद्धतीने गैरप्रकार उघडकीस आले होते. याशिवाय एका कॅफेमध्ये एका युवक युवतीला निर्वस्त्र अवस्थेत ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर अकोल्यातील अनेक गैर प्रकारांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.
जी श्रीधर अकोल्याचे पोलीस अधीक्षक असताना अकोल्यातील अनेक गैरप्रकारांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले. जी श्रीधर यांची बदली झाल्यानंतर संदीप घुगे हे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. घुगे हे काहीतरी करतील या अपेक्षेने अनेक नागरिकांनी त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातून घुगे यांना अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे.
अशातच शिवसेना महिला आघाडीच्या देवश्री ठाकरे, माजी नगरसेविका मंजुषा शेळके, वर्षा पिसोडे, नीलिमा तिजारे, संगीता राठोड, रेखा राऊत, रेखा देशमुख, सीमा मोकळकर, रंजना हरणे, सुनिता श्रीवास यांनी चार डिसेंबरला पत्रकार परिषदेत घेत अकोल्यातील इंटरनेट कॅफे मधील गैरप्रकारांकडे पोलिसांचे लक्ष वेधले. प्रसार माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने दामिनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार दामिनी पथकाने शहरातील अनेक इंटरनेट कॅफेवर छापे घातले. शहरातील सर्वच इंटरनेट कॅफेंना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.