नागपूर : जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या एका ‘भाई’चा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोक्काचा कुख्यात आरोपी चक्क कारागृहापर्यंत आला. ‘भाई’चा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. मोक्काच्या या आरोपीचे धाडस पाहुन पोलिसही चक्रावले. अखेर पोलिसांनी या दुसऱ्या ‘भाई’लाही बेड्या ठोकल्या.
आरोपी रोशन मेश्राम हा कुख्यात गुन्हेगार असून मकोकाचा आरोपी आहे. त्याचाच एक गुंड साथीदार आशू सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तुरुंगातील भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रोशनने तुरुंगाच्या बाहेर फोडायला फटाके आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार रोशनने तुरुंगाच्या गेटवर फटाके फोडले आणि पळून जात असताना धंतोली पोलिसांनी नाकाबंदीमध्ये रोशनला पकडले. पोलिसांनी झडती घेतली असताना त्याच्याकडे एक चाकू देखील सापडला. रोशन पळून जात असलेल्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार रोशन वर गुन्हा दखल केला असून धंतोली पोलीस पुढील तपास करत आहे.
राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांविरोधात पोलिसांनी कठोर पावेले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अशात पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक नसल्याची घटना समोर येत आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरातच असे प्रकार होत असतील तर अन्य जिल्ह्यांमधील गुन्हेगारांचे मनोबल किती उंचावले असेल याची कल्पनाच केलेली बरी. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे प्रमाण, गुंडांची संख्या आणि पोलिस दलावर असलेला अल्प मनुष्यबळाचा ताण अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत ठरत आहेत.