अकोला : भाटे ग्राउंड ते टावर हा महानगरातील एकमेव भूयारीमार्ग आहे. या मार्गात पावसाळ्यात पाणी साचले तर समजू शकतो. परंतु शेजारच्या सांडपाण्याच्या नाल्यांचे पाणी मार्गात झिरपते त्यामुळे वारंवार वाहतूक बंद ठेवण्यात येते. नाल्यांचे झिरपणारे पाणी एका खड्ड्यात जमा होते. ते पंपाच्या सहाय्याने बाहेर काढले जाते. मध्यंतरी पंप चोरीला गेल्यामुळे पाणी साचून वाहतूक बंद होती. मार्गात अनेकवेळा किरकोळ अपघात देखील होतात. भूयारीमार्ग बनवण्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. हा खर्च नागरीकांकडून कर रूपात प्राप्त झालेला पैश्यातून झाला आहे
कुठल्याही कारणामुळे पाणी साचून वारंवार वाहतूक बंद राहाणे योग्य नाही. रस्ते, पूल, भुयारीमार्ग हे नागरीकांच्या सोईसाठी बनवले जातात. परंतु हेच जर गैरसोयीची ठरत असतील तर फायदा काय? कुठलीही गोष्ट निर्माण करतांना दूरदृष्टी ठेवणे आवश्यक आहे. परंतु महानगराचे दुर्दैव आहे की दूरदृष्टीचा अभाव असलेले जनप्रतिनिधी महानगराला लाभले आहेत. राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरीकांची उदासीनता देखील याला कारणीभूत आहे. सुरुवातीला सूचना किंवा विरोध करायचा नाही. नंतर बोटे मोडत बसायचे, त्यामुळेच शहराचा विकास खुंटला आहे. प्रशासनाने भूयारीमार्गाच्या समस्येवर गांभीर्याने विचार करून कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरीकांकडून होते आहे.