Home » अंत्यसंस्काराचे पॅकेज देणारी महाराष्ट्रातील कंपनी ठरतेय सुपरहिट

अंत्यसंस्काराचे पॅकेज देणारी महाराष्ट्रातील कंपनी ठरतेय सुपरहिट

by Navswaraj
0 comment

अकोला : मृत्यु झाल्यानंतरही अनेकांच्या वाट्याला अंत्यसंस्कार येत नाहीत. मोठ्या शहरांमध्ये काहींना खांदा द्यायला लोकं नसतात, पंडित भेटत नाही, ‘रामनाम सत्य है..’ हे म्हणणारे नसतात, केस कापण्यासाठी न्हावी शोधावा लागतो. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये लोकांची चांगलीच गैरसोय होते. लोकांची ही अडचण ओळखत मुंबईत स्थापन झालेली ‘सुखांत’ ही कंपनी सध्या चांगलीच हिट ठरत आहे. अलीकडेच एका प्रदर्शनात या कंपनीने स्टॉल लावला होता. त्यानंतर ही कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे.

अंत्यसंस्काराचे संपूर्ण पॅकेज उपलब्ध करून देणारी सुखांत ही कंपनी मुंबईतील सांताक्रुझ भागातील आहे. प्रत्येक जाती-धर्माच्या नियमांनुसार अंत्यसंस्कारांचे पूर्ण पॅकेजच ही कंपनी उपलब्ध करून देते. कंपनीच्या इंटरनेटवरील वेबसाईटवर नागरीकांना अंत्यसंस्कारासाठी बुकिंग करता येते. त्यासाठी वेगवेगळे पॅकेजेस आहेत. जाती-धर्मनिहाय तिरडी, पंडित, न्हावी, खांदा देणारी मुलं, पार्थिव वाहुन नेणारे वाहन, दाहसंस्कार करण्यासाठी सरपण, दहन साहित्य, दफनविधी करण्यासाठी जागा, अस्थिंचे संकलन, अस्थिंचे विसर्जन, तिसऱ्या दिवसापासून श्राद्धापर्यंतच्या सर्व सुविधा ही कंपनी पुरवित आहे. वृत्तपत्रांमध्ये निधनवार्ता देणे, महापालिकेतून मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देण्याचे कामही कंपनी करते. त्यामुळे बुकिंग करणाऱ्या कोणत्याही कामासाठी कुठेही जावे लागत नाही. सर्वकाही बसल्या ठिकाणी उपलब्ध होते.

ज्या ज्येष्ठ नागरिकांना असे वाटते की मृत्युनंतर आपले पार्थिवही उचलण्यासाठी कुणी नसेल, अशा नागरिकांना त्यांचा अंत सुखाने व्हावा यासाठी ही कंपनी ‘प्री प्लान’ सुविधा पुरविते. या कंपनीचे वेगवेगळे प्लान असून काही ३७ हजार रुपयांपासून सुरू होतात. आता पर्यंत तीन हजारावर लोकांना या कंपनीने अंत्यसंस्कार संबंधी सेवा पुरविली आहे. १४३ लोकांनी अंत्यसंस्काराचा ‘प्री-प्लान’ घेऊन ठेवला आहे. सध्या केवळ मुंबईपुरती मर्यादीत असलेल्या या कंपनीकडुन गुजराती, मारवाडी, मराठी, कोंकणी, सीकेपी, ब्राह्मण, जैन, नेपाळी, तेलुगु, कर्नाटकी, मद्रासी, मल्ल्याळम, बिहारी, सिंधी, बुद्धीस्ट, बंगाली, पंजाबी पद्धतीने अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध करून देत आहे. मुंबई आणि उपनगरांमधील अत्यंत व्यस्त आणि धावपळीचे जीवन असणाऱ्यांसाठी तर या कंपनीने अंत्यसंस्काराच्या सर्व सुविधा एकाच छताखाली आणुन दिल्या आहे.
सध्या महाराष्ट्रातील छोट्या शहरांमध्ये अंत्यसंस्काराचे साहित्य विकणाऱ्यांची लहान-मोठी दुकाने आहेत. या दुकानांमध्येच बॅन्डवाला, न्हावी, तिरडी आदी साहित्य मिळते. परंतु त्याच्या ‘होम डिलिव्हरी’ची सेवा अद्याप तरी कुठे उपलब्ध नाही. याशिवाय पंडित, सरपण, रॉकेल, गोवऱ्या, शववाहिका आदींसाठी संपर्क कराव लागतो तो वेगळाच, त्यामुळे धावपळीच्या जीवनात कालांतराने छोट्या शहरांमध्येही अशा कंपन्यांचे जाळे निर्माण झाल्यास आश्चर्य वाटु नये.

error: Content is protected !!