अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला महानगरच्या वतीने पर्यावरण गतिविधिच्या अंतर्गत २७ ऑगस्ट रोजी प्रकृतीवंदन कार्यक्रम बी आर हायस्कुल चे प्रांगणात संपन्न झाला.
मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण गतिविधी विभागाचे विदर्भ प्रांत संयोजक अण्णा देशमुख, प्रमुख वक्ता रामप्रकाश वर्मा, आधार संस्कार मंडळाचे अध्यक्ष जयनेंद्र लुंकड, अकोला विभाग प्रचारक दीपक बलमे होते. भारतमातेच्या प्रतिमेचे तसेच वटवृक्षाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
अण्णा देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात पर्यावरणाचे महत्व विशद केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीतजास्त वृक्षारोपण करून ते जगवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, कोणती झाडे लावावीत जी वर्षानुवर्षे आपल्या परिसरातील तापमान कमी करतील याची माहिती प्रमुख वक्ता रामप्रकाश वर्मा यांनी विस्ताराने दिली. प्राणवायुचे उत्सर्जन करणारी झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना याप्रसंगी केले.
सेवा विभागांतर्गत चालणाऱ्या संस्कार वर्गाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वटवृक्षाचे पूजन केले. महानगरात सुरू असलेल्या संस्कार केंद्राचे आणि शिकवणी वर्गाच्या बहुआयामी १६ विद्यार्थ्यांचा यावेळी लेखणी व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शशांक जोशी यांनी केले.